महासंगम न्यूज ऑनलाईन
संगमनेर: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वांवर संगमनेरच्या सहकाराची यशस्वी वाटचाल सुरू असून, यामुळे तालुक्यात मोठी आर्थिक समृद्धी आली आहे, असे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नूतन, सुंदर आणि वैभवशाली प्रशासकीय इमारतीमध्ये दीपावलीनिमित्त आयोजित लक्ष्मीपूजन समारंभात ते बोलत होते.
थोरात म्हणाले, १९६८ मध्ये ८०० मे. टन क्षमतेपासून सुरू झालेला हा कारखाना आता ५५०० मे. टन क्षमतेचा होऊन राज्यासाठी एक पॅटर्न ठरला आहे. या सहकारी संस्थांमुळे सभासद शेतकरी, उत्पादक, कामगार यांच्या जीवनात आनंद निर्माण होऊन खेडोपाडी शेतकऱ्यांनी बंगले बांधले, हीच खरी समृद्धी आहे.

कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला आहे. कारखान्याची ८५ हजार स्क्वेअर फुटाची नवीन इमारत अत्यंत सुंदर व वैभवशाली असून, शहराच्या वैभवात भर टाकणारी आणि देशातील इतर कारखान्यांसाठी आदर्शवत ठरणारी आहे, असे मत डॉ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केले. राजवर्धन थोरात यांनी भाऊसाहेब थोरात यांना ‘ग्रेट आर्किटेक्ट’ (वास्तुविशारद) संबोधून त्यांनी सहकार आणि माणसे उभी केली, असे गौरवोउद्गार काढले.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांसाठी तातडीने संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी केली. अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत आहेत. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळून संपूर्ण कर्जमाफीच्या रूपाने दिवाळी भेट द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांसाठी ही ‘काळी दिवाळी’ ठरेल, असे ते म्हणाले.
थोरात यांच्या हस्ते कारखान्यासह राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक, जिल्हा सहकारी बँक, राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी यांसह अमृत उद्योग समूहाच्या विविध सहकारी संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी माधवराव कानवडे, पांडुरंग पा. घुले, कांचनताई थोरात, रणजितसिंह देशमुख, राजवर्धन थोरात, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.