अहिल्यानगर/नवी दिल्ली- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले पत्रकार बाळ बोठे पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

30 नोव्हेंबर 2020 रोजी अहमदनगरजवळील जातेगाव घाटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या असलेल्या रेखा जरे यांची हत्या झाली होती. त्यांची कार अडवून धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरण्यात आला होता. या हत्येची सुपारी पत्रकार बाळ बोठे यांनी दिल्याचा आरोप असून ते या हत्याकांडाचे ‘मास्टरमाईंड’ असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.
या हत्येनंतर पोलिसांनी तात्काळ तपास करत काही संशयितांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून बाळ बोठे यांचे नाव समोर आले होते. हत्येनंतर काही महिने फरार असलेल्या बोठे यांना 20 मार्च 2021 रोजी अटक करण्यात आली होती.