संगमनेर:
संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, प्रशासनाने कोणताही विलंब न लावता तातडीने सरसकट पंचनामे पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, डेरेवाडी, गोडसेवाडी, निमज आणि राजापूर या गावांतील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. या नैसर्गिक आपत्तीत गहू, कांदा, टोमॅटो, मका आणि डाळिंबाची उभी पिके जमिनीदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार खताळ यांनी धांदरफळ खुर्द येथील सिंधुबाई देवगिरे यांच्या डाळिंब बागेची, भास्कर कोकणे यांच्या टोमॅटो पिकाची, तसेच निमज येथील कृषीभूषण तुकाराम गुंजाळ यांच्या डाळिंब बागेची आणि श्यामराव किसन कासार यांच्या गव्हाच्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. शेतीसोबतच घरांचेही मोठे नुकसान झाले असून, डेरेवाडी येथील संजय शिवाजी साबळे यांच्या घराचे पत्रे उडून त्यांची मुलगी आदिती साबळे जखमी झाली आहे, तिच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय भास्कर आल्हाट आणि वर्षा भीमराज गोर्डे यांच्या घरांचेही नुकसान झाले असून निमज येथील महानुभाव पंथाच्या आश्रमावरील पत्रेही उडून गेले आहेत.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक, राजेश गुंजाळ यांसह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बाधितांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करेल, अशी ग्वाही आमदार खताळ यांनी दिली.


