संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील झोळे येथील कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत कर्ज देण्याच्या बहाण्याने अनुसूचित जातीच्या कुटुंबाची जमीन हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर बादशहा वाळे याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे.
दुसरीकडे, या गुन्ह्यातील सहआरोपी असलेल्या वाळे याची संचालक असलेली पत्नी आणि पतसंस्थेची महिला व्यवस्थापक यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
या प्रकरणी बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर, न्यायालयाने यापूर्वीच या तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले होते. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या पथकाने त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना पुन्हा जिल्हा न्यायाधीश एम. एम. शेख यांच्यासमोर उभे करण्यात आले.
यावेळी सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी प्रभावी युक्तिवाद करत, गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून तपासासाठी २०१२ आणि २०२० चे महत्त्वाचे रजिस्टर जप्त करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या फसवणुकीमुळे अनेक पीडित धास्तीपोटी समोर येत नसल्याचेही सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर न्यायालयाने मुख्य सूत्रधाराला अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


