शिर्डी:
महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला भोंदू बाबा ऊर्फ कॅप्टन अशोककुमार खरात आता जमिनीच्या व्यवहारातील फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणात अडकला आहे.
शिर्डी येथील एका चार एकर जमिनीच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आणि व्याजाच्या पैशांसाठी धमकावल्याबद्दल शिर्डी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी अशोककुमार खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी यातील किरण सोनवणे आणि अरविंद बावके या दोन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ पासून शिर्डी, नाशिक आणि राहाता परिसरात हा जमिनीचा वाद सुरू होता. पीडित व्यक्तीला पैशांची गरज असताना खरातने त्यांना दरमहा दोन टक्के व्याजाने पैसे दिले होते. पीडिताने व्याजासह रक्कम परत करण्याची तयारी दर्शवली असतानाही, आरोपींनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आणि त्यांची हक्काची जमीन नावावर करून न देता फसवणूक केली.
याशिवाय पीडित व्यक्तीच्या कोऱ्या चेकबुकचा गैरवापर करून त्यांच्या खात्यातील रक्कम परस्पर वर्ग करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
या गंभीर तक्रारीची दखल घेत शिर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील विविध कलमान्वये पाचही जणांवर गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.


