Wed. Apr 1st, 2026

संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या बहुचर्चित बाळासाहेब चत्तर यांच्या खून प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने मुख्य आरोपी राहुल देविदास काळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, अन्य दोन आरोपींना प्रत्येकी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

ही घटना २२ जून २०२० रोजी घडली होती. फिर्यादी प्रतीक बाबासाहेब चत्तर यांच्या ‘कमळेश्वर चिकन शॉप’वर जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी राहुल देविदास काळे, देविदास हरिभाऊ काळे आणि रामनाथ सावित्रा गायकवाड यांनी हल्ला केला होता.

यावेळी राहुल काळे याने प्रतीकचे वडील बाळासाहेब चत्तर यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांची हत्या केली, तर वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या प्रतीकवरही प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील जयंत दिवटे यांनी १५ साक्षीदार तपासले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरीया आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी पुराव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.

न्यायालयाने मुख्य आरोपी राहुल काळे याला भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप व २० हजार रुपये दंड, तसेच कलम ३०७ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी देविदास काळे याला १० वर्षे साधी कैद व ७६ हजार रुपये दंड, तर रामनाथ गायकवाड याला १० वर्षे सक्तमजुरी व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.

दंडाच्या रकमेतील काही हिस्सा फिर्यादीच्या कुटुंबाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात पोलीस पैरवी अधिकारी प्रवीण डावरे, नयना पंडित आणि शीतल तोरकडी यांनी सहकार्य केले.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!