Wed. Apr 1st, 2026

संगमनेर (महासंगम न्यूज ऑनलाईन):

संगमनेर नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून, यामध्ये एक आगळावेगळा राजकीय योगायोग पाहायला मिळाला आहे. सभागृहात सत्ताधाऱ्यांचे प्रचंड बहुमत असले तरी, शिवसेनेच्या एकमेव विरोधी नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी तब्बल सहा समित्यांवर सदस्य म्हणून स्थान मिळवत आपला दबदबा निर्माण केला आहे.

सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे व उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील सेवा समितीने २७ नगरसेवकांसह पालिकेवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले असून, दोन अपक्ष नगरसेवकांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. अशा स्थितीत महायुतीकडून शिवसेनेच्या साक्षी सूर्यवंशी या एकमेव विरोधी नगरसेविका म्हणून सभागृहात काम पाहत आहेत.

विषय समिती निवडीमध्ये सत्ताधारी सेवा समितीच्या नगरसेवकांना साधारणपणे दोन समित्यांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, विरोधी पक्षाचे प्रतिनिधित्व करताना साक्षी सूर्यवंशी यांची महिला व बालकल्याण, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य, सार्वजनिक बांधकाम, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, तसेच नियोजन आणि विकास या सर्व सहा समित्यांवर वर्णी लागली आहे.

महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर त्यांना संधी मिळाली नसली, तरी इतर सर्व समित्यांमध्ये सदस्य म्हणून स्थान मिळवणाऱ्या त्या एकमेव नगरसेविका ठरल्या आहेत. अर्धा डझन समित्यांमध्ये समावेश झाल्यामुळे आता पालिकेच्या सर्वच विभागांतील कामात त्यांचा सक्रिय सहभाग आणि प्रभाव पाहायला मिळणार आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!