संगमनेर –
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. निवडणुकीचा निकाल लागून बराच काळ उलटल्यानंतरही आपल्या खर्चाचा अधिकृत हिशोब सादर न करणाऱ्या १२ उमेदवारांना प्रशासनाने आता ‘अल्टिमेटम’ दिला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निवडणुकीतील प्रत्येक खर्चाचा तपशील विहित मुदतीत देणे बंधनकारक असतानाही, संगमनेरमधील काही उमेदवारांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने कडक भूमिका घेतली असून, संबंधित उमेदवारांना येत्या २० जानेवारी २०२६ पर्यंत खर्चाचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या मुदतीत हिशोब न दिल्यास या उमेदवारांवर निवडणूक आयोगाचा बडगा उगारला जाणार असून, त्यांना कायमचे अपात्र ठरवण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, २० जानेवारीनंतर कोणत्याही सबबी ऐकून घेतल्या जाणार नाहीत आणि मुदतीनंतर येणारा कोणताही अहवाल स्वीकारला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांची नावे थेट अपात्रतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली जाणार आहेत.
हिशोब सादर न करणाऱ्यांमध्ये नगराध्यक्षपदाच्या एका उमेदवारासह नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवलेल्या इतर उमेदवारांचा समावेश आहे. संबंधित उमेदवारांनी आपला सविस्तर खर्च अहवाल संगमनेर पंचायत समितीमध्ये तातडीने जमा करणे आवश्यक आहे. भविष्यातील राजकीय कारकीर्द धोक्यात येण्यापूर्वी या उमेदवारांना ही शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता संबंधित उमेदवार या मुदतीत हिशोब सादर करून कारवाई टाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
