संगमनेर:
तालुक्यातील वडझरी बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणकाम, तीव्र ब्लास्टिंग आणि स्टोन क्रेशरच्या त्रासाला कंटाळून स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी आज, १ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.
गावालगत अव्याहतपणे सुरू असलेल्या या खाणकामामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून, जोरदार ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले आहेत. तसेच विहिरी आणि बोअरवेलच्या पाणी पातळीवर विपरीत परिणाम झाला असून क्रेशरच्या धूळ प्रदूषणामुळे लहान मुले व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने यापूर्वी केवळ चौकशीचे आदेश देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप करत, आता मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
ग्रामस्थांनी हे बेकायदेशीर खाणकाम व स्टोन क्रेशर तात्काळ पूर्णपणे बंद करण्याची मुख्य मागणी केली आहे. यासोबतच घरांच्या व शेतीच्या नुकसानीचे शासकीय पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई मिळावी, प्रदूषण नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली आहे.
सध्या उपोषणस्थळी शेतकरी, महिला आणि तरुणांचा पाठिंबा वाढत असून, या खाणचालकांना नेमके कोणाचे राजकीय किंवा प्रशासकीय अभय लाभले आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

