नाशिक/चांदवड:
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी चांदवड येथे महाविकास आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला आता डावे पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेने सक्रिय पाठिंबा दिला आहे. आंदोलनादरम्यान पोलीस व प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बळाच्या वापराचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि किसान सभेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
शासनाच्या या दडपशाहीविरोधात आता सर्व डाव्या आघाड्या आणि शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्या असून, आगामी काळात या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर वाढवण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले असल्याने, कांद्याला प्रति क्विंटल किमान ३,००० रुपये भाव मिळावा आणि सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १,५०० रुपयांचे थेट रोख अनुदान द्यावे, या आंदोलनाच्या मुख्य मागण्या आहेत.
लोकशाही मार्गाने सुरू असलेला हा लढा पोलिसांच्या कोणत्याही दडपशाहीला न जुमानता सुरूच राहील, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. तसेच, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेचे नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी केले आहे.


