लोणी:
राहता तालुक्यातील चंद्रपूर गावातील साठवण तलावात गुरुवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. तलावात आंघोळीसाठी उतरलेल्या तिघा तरुणांचा साठवण तलावात बुडून मृत्यू झाला.
या दुर्घटनेत अभिषेक गंगाधर जाधव (वय २४, सुरेगाव शिंगणापूर, नेवासा), प्रवीण प्रभाकर रसाळ (वय २३, रामनगर, छत्रपती संभाजीनगर) आणि महेश अशोक शिंदे (वय २६, संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर) या उच्चशिक्षित तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
लोणी येथील पायरेन्स आयबीएमए (IBMA) कॉलेजमध्ये एमबीएच्या द्वितीय वर्षात शिकणारे तीन विद्यार्थी तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. पाण्याच्या कडेला गेले असताना खोलीचा आणि पाण्याच्या खालील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक पाण्यात बुडू लागले. सोबतच्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने तिघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबासह महाविद्यालयीन वर्तुळात आणि संपूर्ण लोणी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. माहिती मिळताच लोणी पोलिसांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला आहे.
