Fri. May 29th, 2026

अकोले:

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या तीव्र आर्थिक संकटात सापडला असून, बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर आज तीव्र आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातच कांदे ओतून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा जाहीर निषेध केला.

या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केले. आंदोलनापूर्वी अकोले शहरातून शेतकऱ्यांची एक जोरदार मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध घोषणा देत शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले. अवकाळी पाऊस, बदलणारे हवामान आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला बाजारातील पडलेल्या दरांचा मोठा फटका बसत आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षाही खाली गेल्याने वाहतूक, मजुरी आणि साठवणुकीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यातच केंद्र सरकारकडून वारंवार लादली जाणारी निर्यात बंदी आणि बाजार हस्तक्षेपाचा अभाव यामुळे कांदा उत्पादकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी अत्यंत महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे लावून धरल्या आहेत. यामध्ये कांद्याला किमान ३,००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कमी दरात कांदा विकला आहे त्यांना प्रति क्विंटल १,५०० रुपये अनुदान देऊन हा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, कांद्याच्या प्रश्नावर सरकारने दीर्घकालीन धोरण आखून साठवणूक क्षमता वाढवावी आणि निर्यात बंदीऐवजी निर्यात प्रोत्साहनाचे धोरण स्वीकारून कांदा उत्पादकांना ठोस आर्थिक संरक्षण द्यावे, असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. याच आंदोलनादरम्यान केरळचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर राजकीय सूडबुद्धीने टाकण्यात आलेल्या ईडीच्या धाडीचाही केंद्र सरकारचा निषेध नोंदवून धिक्कार करण्यात आला.

या आंदोलनात किसान सभेचे सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, तुळशीराम कातोरे, ज्ञानेश्वर काकड, संगीता साळवे, हेमलता शेळके, दत्ता गोंदके, बाळासाहेब भोर, अजित चौधरी, दत्ता कोंडार, योगेश भरितकर, बाळासाहेब मधे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!