Tue. Jun 2nd, 2026

संगमनेर:

तब्बल महिन्याभरापूर्वी संगमनेर जवळील समनापूर बायपास चौफुली येथे झालेल्या भीषण आणि प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी अरबाज जहागीरदार याला अटक करण्यात संगमनेर शहर पोलिसांना अखेर यश आले आहे. गेल्या एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या या मुख्य आरोपीला पोलिसांनी थेट पुण्यातून ताब्यात घेतले आहे तर एकाला संगमनेर शहरातून त्याच्या राहत्या घरात अटक केली आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे संगमनेर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुमारे एका महिन्यापूर्वी संगमनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या समनापूर बायपास चौफुली जवळ दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले आणि त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हा हल्ला किरकोळ स्वरूपाचा नसून अत्यंत गंभीर आणि जीवघेणा होता; हल्लेखोरांनी फिर्यादीवर चाकूने तब्बल ७ वार केले होते. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०९ (पूर्वीचे आयपीसी ३०७ – खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील काही आरोपींना आधी अटकपूर्व जामीन मिळाला होता, मात्र मुख्य आरोपी फरार होता.

घटना घडल्यापासूनच मुख्य आरोपी जुनेद शेख आणि अरबाज जहागीरदार हे फरार झाले होते. पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते, तर दुसरीकडे तक्रारदारही आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे वारंवार करत होते. आरोपी सापडत नसल्याने काही अंशी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढण्यात आले होते. मात्र, कोणत्याही टीकेला उत्तर न देता संगमनेर शहर पोलिसांनी अत्यंत गुप्ततेने आणि चिकाटीने आपला तपास सुरू ठेवला.

शेवटी पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. मुख्य आरोपी अरबाज हा पुण्यात लपून बसल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. तो पुण्यातील खराडी या परिसरात ‘पेइंग गेस्ट’ (PG) म्हणून एका रूममध्ये वास्तव्यास होता. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, संगमनेर पोलिसांनी पुण्यातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या दरम्यान सापळा लावला. आरोपीला काही कळायच्या आतच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सकाळी साडेपाच वाजता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले, त्यानंतर लगेचच जुनेद शेख याला त्याच्या राहत्या घरातून अटक करून दोघांचीही वैद्यकीय चाचणी (मेडिकल) करून त्यांना पोलीस कोठडीत रवाना करण्यात आले. आरोपीस आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

महिनाभर हुलकावणी देणारे मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची बातमी संगमनेर शहर व परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी दाखवलेल्या या संयम, चातुर्य आणि धडाकेबाज कामगिरीचे नागरिकांमधून तोंडभरून कौतुक केले जात आहे. ‘काहीही गाजावाजा न करता पोलिसांनी गुन्हेगाराला थेट पुण्यातून उचलून आपल्या खाकीची ताकद दाखवून दिली आहे,’ अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. तर सदरची धडाकेबाज कारवाई अहिल्यानगरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे (श्रीरामपूर), संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि त्यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे, पोलीस शिपाई साईनाथ पवार व शशिकांत दाभाडे यांनी केली आहे. तर पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!