संगमनेर:
संगमनेर शहरातील मालपाणी बजाज शोरूममध्ये दुचाकी दुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या वादातून ग्राहक आणि त्यांच्या ज्येष्ठ सासऱ्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी शोरूमचे मॅनेजर सचिन पलोड यांच्यासह १० ते १५ कर्मचाऱ्यांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी स्वप्निल रोहिदास सातपुते (रा. कासारा दुमाला, संगमनेर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या सासऱ्यांनी वर्षभरापूर्वी खरेदी केलेली बजाज चेतक इलेक्ट्रिक दुचाकी बंद पडल्याने ते आणि त्यांचे सासरे त्रिंबक राऊत हे ३० मे रोजी सकाळी शोरूममध्ये दुरुस्तीसाठी गेले होते.
गाडी जमा करून घेतल्यानंतर पावती देण्यास विलंब होत असल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. यावेळी मॅनेजर सचिन पलोड यांनी उद्धटपणे वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घडणाऱ्या प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण सुरू केल्यानंतर वाद अधिक वाढला. तक्रारीनुसार, मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांनी स्वप्निल सातपुते व त्यांच्या सासऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच काही जणांनी लोखंडी रॉड आणि स्क्रू-ड्रायव्हरचा वापर करून गंभीर दुखापत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यावेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही फिर्यादीत उल्लेख आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सचिन पलोड, मंगेश मिसाळ, विष्णू मोहरीकर, सचिन धुमाळ, धारणकर आणि इतर अनोळखी कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव करत आहेत.


