संगमनेर:
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानक परिसरात नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आपला संताप व्यक्त केला. या नराधमाला तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित असणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. एकीकडे प्रगत भारताच्या घोषणा दिल्या जात असताना दुसरीकडे चिमुकल्यांवर होणारे अत्याचार वाढत आहेत. वडगाव पान येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील आरोपी अजूनही सापडत नाहीत, हे सरकारचे अपयश आहे. गुन्हेगाराला जात-धर्म नसतो, त्यामुळे अशा प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी सरकारने आता चौरंग करण्यासारखी अत्यंत कठोर शिक्षा देण्याची वेळ आली आहे.
माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीही आपला रोष व्यक्त करताना म्हटले की, लहान मुलींना शाळेत पाठवतानाही आता भीती वाटू लागली आहे. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी मृत्यूदंडापेक्षाही कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात व्हायला हवी.
तर नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी एक माता आणि स्त्री म्हणून मुलींच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत सरकारने तातडीने कडक कायदे अंमलात आणावेत, असे आवाहन केले.
या निषेध कॅन्डल मार्चवेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, नगरसेवक किशोर टोकसे, विशाल ढोले, सिद्धेश घाडगे, मनीषा राहणे, प्रियंका जगनर, वनिता गाडे, प्रकाश कडलग, प्राची कवडे, अर्चना दिघे, प्राजक्ता कुलकर्णी, तनिष्का कुलकर्णी, समीर कुलकर्णी, ललित शिंदे, शर्मिला हांडे, सुभाष दिघे, प्रीतम साबळे, प्राजक्ता घुले, वृषाली साबळे, डॉ. अनुराधा सातपुते, सरोज पगडाल, नंदा गरुडकर, यशवंती नरवडे, श्रीकांत साबळे, शरद पावबाके, सोमनाथ गोडसे, ऋत्विक राऊत, शुभम शिंदे, मयूर घुले, अलोक बर्डे, सुरभी मोरे, वैशाली कडबाने, अमृता राऊत, तात्याराम कुटे यांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
आंदोलनानंतर उपस्थितांच्या वतीने लहान मुलींचे हस्ते देण्यात आलेले निवेदन प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वीकारले. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


