Fri. May 29th, 2026

संगमनेर:

तालुक्यातील चिंचोली गुरव शिवारातील पारेगाव रोड येथील आभाळे वस्तीवर एक धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोराने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे २ लाख १३ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन गंगाधर सोनवणे (वय ४३) हे आपल्या कुटुंबासह पारेगाव रोड येथे राहतात. गुरुवारी रात्री ते झोपलेले असताना, मध्यरात्री ते शुक्रवार पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील ६० हजार रुपये किमतीचे १ तोळ्याचे मणिमंगळसूत्र, ६० हजार रुपयांचे दुसरे एक तोळ्याचे मणिमंगळसूत्र, २४ हजार रुपयांचे सोन्याचे कानातले टॉप्स आणि साखळीचे लटकन, १८ हजार रुपयांचे ३ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, ३० हजार रुपयांचे ५ ग्रॅमचे मणिमंगळसूत्र, १५०० रुपयांची चांदीची चैन व अंगठी आणि २० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक सातपुते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तातडीने श्वानपथक, फिंगर प्रिंट तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून, त्यांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.

फिर्यादी सोनवणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते करत आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!