संगमनेर | प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या विविध प्रवासी सवलत योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळावा यासाठी संगमनेर बसस्थानक आगार आणि आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून तालुक्यात ४० विशेष शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मोहिमेद्वारे तालुक्यातील सुमारे ६ हजार लाभार्थ्यांना त्यांच्या गावातच स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती आमदार कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना वारंवार बसस्थानकात जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत होती. ही अडचण दूर करण्यासाठी थेट गावागावांत शिबिरे घेऊन नोंदणी, कागदपत्र पडताळणी आणि कार्ड वितरणाची प्रक्रिया राबवण्यात आली. आगाराच्या सुयोग्य नियोजनामुळे ही मोहीम अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पार पडली. घरपोच मिळालेल्या या सुविधेबद्दल ग्रामीण भागातील नागरिकांनी आमदार अमोल खताळ आणि आगार प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.
“नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेताना त्रास होऊ नये, यासाठी भविष्यातही अशा लोकाभिमुख उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल. शासनाच्या सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असून, या यशस्वी मोहिमेमुळे ग्रामीण भागात प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.” – अमोल खताळ (आमदार)
