Sat. Jun 13th, 2026

संगमनेर:

तालुक्यातील मालदाड-घुलेवाडी शिवेवरील गव्हाळी वस्तीला जाणारा महत्त्वाचा शिवरस्ता तब्बल पन्नास वर्षांनंतर अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष पुढाकारामुळे आणि महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गेल्या अनेक दशकांपासून बंद असलेला हा रस्ता अवघ्या १५ दिवसांत नागरिकांसाठी खुला झाला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अडीचशे ते तीनशे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मालदाड व घुलेवाडी परिसरातील विविध अतिक्रमणांमुळे गव्हाळी वस्तीचा गावाशी संपर्क साधणारा सुमारे तीन ते चार किलोमीटरचा मुख्य मार्ग बंद झाला होता. परिणामी, शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांची शालेय ये-जा आणि रुग्णांची ने-आण करताना स्थानिक नागरिकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. या गंभीर समस्येबाबत गव्हाळी वस्तीतील शेतकरी, महिला व युवकांनी एकत्र येत आमदार अमोल खताळ यांची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली.

आमदार खताळ यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ महसूल विभागाला पाहणी करण्याचे आणि शिवरस्ता योजनेअंतर्गत रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले. आमदारांच्या सूचनेनुसार तहसीलदार धीरज मांजरे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर घुलेवाडीचे मंडलाधिकारी रफिक शेख, महसूल अधिकारी बाळकृष्ण सावळे, मालदाडचे महसूल अधिकारी राहुल ढेरंगे, भूमीअभिलेख विभागाचे भूमापक नितीन हंडोरे तसेच तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या संयुक्त पथकाने मोहीम हाती घेतली. अत्यंत खडतर मानला जाणारा हा रस्ता प्रशासनाने संयम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर विविध अडथळे दूर करत तीन टप्प्यांत पूर्णपणे मोकळा केला. पन्नास वर्षांनंतर हक्काचा मार्ग मोकळा झाल्याने गव्हाळी वस्तीत आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी आमदार खताळ आणि प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.

रस्ता खुला झाल्यामुळे गव्हाळी वस्तीतील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटला असला, तरी आता या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

यामध्ये ज्येष्ठ नागरिक दत्तू नवले, राहुल नवले, गणेश नवले, संतोष नवले, दिगंबर दिघे, पोपट नवले, सिद्धार्थ भालेराव, गोकुळ नवले, नितीन नवले, अण्णासाहेब नवले, सुनील नवले, विकास नवले, भाऊसाहेब नवले, सुलोचना नवले, रेखा नवले, अनिता नवले, कुमारी श्रावणी नवले आणि कार्तिक नवले यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. रस्ता पक्का झाल्यास परिसराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळेल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!