संगमनेर:
यश, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या धडपडीत आजचा माणूस स्वतःचे आरोग्य, नातेसंबंध आणि आनंद हरवून बसत आहे. एव्हरेस्टसारखी यशाची शिखरे सर केली तरी आयुष्याच्या प्रवासात माणूस एकटा पडता कामा नये. यशाबरोबरच प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त आयएएस अधिकारी व नाम फाऊंडेशनचे व्याख्याते इंद्रजीत देशमुख यांनी येथे केले.
पूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय पाटणकर यांच्या हस्ते देशमुख यांचे स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना देशमुख यांनी संत परंपरेचे समाजजीवनातील महत्त्व अधोरेखित केले. संतांनी समाजात चांगुलपणा रुजवण्यासाठी आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी सप्ताह, पारायण व कीर्तनाची सुंदर परंपरा निर्माण केली आहे, असे ते म्हणाले.
मानवी जीवनातील आश्रम व्यवस्था विशद करत त्यांनी पूर्वीचा माणूस निसर्गाशी सुसंगत जीवन जगत असल्याने दीर्घायुषी होता, अशी आठवण करून दिली. तसेच आज आपण भौतिकदृष्ट्या समृद्ध झालो असलो, तरी मिळवलेली शक्ती, ज्ञान आणि संस्कार पुढील पिढीकडे हस्तांतरित करणे हेच आपले खरे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
उत्तम आरोग्य हा माणसाचा सर्वात मौल्यवान दागिना आहे, असे सांगत त्यांनी आजचा माणूस पैशाच्या मागे धावताना शरीरस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा दाखला दिला.
यश मिळविणे महत्त्वाचे आहेच, पण त्या यशाचा निखळ आनंद घेत आयुष्याचा प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगला पाहिजे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. या व्याख्यानाला संगमनेर परिसरातील भाविक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
