Sat. Jun 13th, 2026

संगमनेर:

देशातील सद्यस्थिती ही केवळ सत्तेची लढाई नसून विचारधारेची लढाई आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची विचारधारा पूर्णपणे एकच आहे, असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. राज्यघटना, संतांचे विचार, बहुजन समाज आणि पुरोगामी विचारसरणी हा दोन्ही पक्षांचा सामायिक पाया असून, केवळ दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहोत इतकाच काय तो फरक आहे, असे सांगत शरद पवार हे प्रतिगामी विचारधारा कधीही स्वीकारणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुका दूध संघाच्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. देशातील लोकशाही आणि संविधान सध्या धोक्यात आले असून स्वायत्त संस्थांची स्वायत्तता संपत चालल्याची भीती थोरात यांनी व्यक्त केली.

माध्यमांचा जागतिक निर्देशांक खालावला असून न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे, तर निवडणूक आयोगाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. अशा संकटकाळात लोकशाही टिकवण्यासाठी सर्व लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाबाबत हाय कमांडकडून चर्चा सुरू असल्याच्या बातम्यांवर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. या विषयावर अद्याप आपल्याशी वैयक्तिक पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

तसेच, राजकारणातील वाढत्या दोषांवरून सत्ताधाऱ्यांना टोला लगावताना ते म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये आणि राजकारणात दोष इतके वाढले आहेत की, आता त्यात काही ‘चांगले’ शोधण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. थोरात यांच्या या विधानांमुळे राज्यातील आगामी राजकीय समीकरणांबाबतच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!