Fri. Jun 5th, 2026

संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि तीन सदस्यांना नाशिकच्या अप्पर विभागीय आयुक्तांनी मोठा दिलासा दिला आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ११ मे रोजी सरपंच निर्मला राऊत, सदस्य दत्तात्रय राऊत, सोनाली गिरी आणि अनिल राऊत यांना अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात सत्ताधारी सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते.

मंगळवारी (२ जून) झालेल्या सुनावणीदरम्यान विरोधी पक्षाचे वकील उपस्थित न राहिल्याने त्यांनी पुढील तारीख मागितली. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांच्या अपात्रतेच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जुलै रोजी होणार आहे. या स्थगितीनंतर सरपंच निर्मला राऊत यांच्यासह इतर सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या नियमित कामकाजाला पुन्हा सुरुवात केली आहे.

घुलेवाडी ग्रामपंचायतीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाचे वर्चस्व असून शिवसेना शाखाप्रमुख शरद पानसरे यांनी या संदर्भात तक्रार केली होती. सध्या गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असून एका मोठ्या पाणी योजनेचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील नवीन लोकप्रतिनिधींच्या स्थानिक समर्थकांकडून विकासकामांमध्ये राजकीय अडथळे आणले जात असल्याचा आरोप घुलेवाडीच्या सत्ताधार्‍यांनी केला आहे.

दरम्यान, हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा आणि कायदेशीर लढ्याचा विजय असून गावातील विकासकामांना गती देणे हेच आपले मुख्य ध्येय राहील, अशी प्रतिक्रिया सरपंच निर्मला राऊत यांनी दिली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!