महासंगम न्यूज ऑनलाईन
घारगाव (संगमनेर) –
पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर तालुक्यातl धक्कादायक घटना घडली आहे. घारगावजवळ पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी अभिमन्यू सुरेश मोटे यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणी घारगाव येथील अण्णासाहेब वाडगे आणि त्याचा मुलगा साहिल अण्णासाहेब वाडगे या दोघांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी अभिमन्यू मोटे हे कुटुंबियांसह नाशिकहून पुण्याकडे प्रवास करत होते. घारगावजवळ महामार्गावर वाहतूक ठप्प असताना, आरोपी अण्णासाहेब वाडगे याने अचानक आपली गाडी आडवी लावली. याच शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून अण्णासाहेब वाडगे याने लोखंडी रॉडने पोलीस कर्मचाऱ्यास जबर मारहाण केली. या हल्ल्यात अभिमन्यू मोटे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर आरोपी बाप-लेक, अण्णासाहेब वाडगे आणि साहिल वाडगे, हे दोघेही फरार झाले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी या घटनेची माहिती दिली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने दोन पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाप-लेकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, त्यांच्यावर यापूर्वीही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची मागणी – या घटनेमुळे पठार भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाकच उरलेला नाही, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. घारगाव, बोटा महामार्गावरील ढाब्यांवर दिवसाढवळ्या सर्रास दारू विक्री सुरू असल्यामुळे गुन्हेगारी कृत्ये वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीस कर्मचाऱ्यावरच झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यानंतर, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पठार भागातील सर्व अवैध धंदे तात्काळ आणि पूर्णपणे बंद करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
