Sat. May 30th, 2026

संगमनेर: संगमनेर शहर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधात आतापर्यंतची एक मोठी आणि निर्णायक कारवाई यशस्वी केली आहे. मध्यरात्रीच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमारे ३ लाख ९ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन (M.D.) हे उच्चभ्रू ड्रग्ज जप्त केले आहे.

या कारवाईत नाशिक येथील आशिष सुनिलदत्त मेहेरे (वय २८) या तरुणाला अटक करण्यात आली असून, तस्करीसाठी वापरलेली ४० लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर (क्र. MH 15 FF 9630) ही आलिशान गाडीही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या ड्रग्ज आणि वाहनाची एकूण किंमत सुमारे ४३ लाख रुपये इतकी आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी आशिष मेहेरे हा शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास गणेश नगर परिसरात ‘एमडी’ ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार होता. माहितीची खातरजमा होताच पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मध्यरात्री ४:१० वाजता नाशिकहून आलेल्या सिल्व्हर रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून उतरलेल्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

अंगझडतीत आरोपीच्या पॅन्टच्या खिशात आणि गाडीमध्ये मिळून एकूण १०३ ग्रॅम वजनाची पांढरी स्फटिक सदृश पावडर (एम.डी.) जप्त करण्यात आली. आरोपीने हा अंमली पदार्थ असल्याचे कबूल केले.

या कारवाईमुळे संगमनेर शहरात अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याची आणि उच्चभ्रू घरातील तरुणाई व्यसनाच्या विळख्यात अडकल्याची चिंता व्यक्त होत आहे. आरोपी आशिष मेहेरे याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखालील पथक पुढील तपास करत आहे. या रॅकेटमधील मोठे धागेदोरे उघड होतील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!