संगमनेर: नाशिक नार्कोटिक्स विभागाने संगमनेरजवळ एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत अंमली पदार्थांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. संगमनेर शहरालगत असलेल्या सुकेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये तब्बल सव्वा कोटी रुपये किमतीचा ४५६ किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
नाशिक येथील नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे पोलीस उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांना सुकेवाडी गावात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उपअधिक्षक पाटील यांनी तातडीने एक पथक तयार करून सुकेवाडी येथे धाड टाकली.
या कारवाईत मुख्य आरोपी तुषार उत्तम पडवळ उर्फ दमल्या (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) याच्या घरावर झडती घेतली असता, सुरुवातीला ३०० किलो गांजा घरात मिळून आला. त्यानंतर परिसरातील एका छोटा हत्ती टेम्पोची तपासणी केली असता, त्यात आणखी १५६ किलो गांजा पाकिटांमध्ये पॅक करून ठेवलेला आढळला. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ४५६ किलो सुका गांजा, तसेच अन्य वस्तू असा सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र, कारवाईदरम्यान मुख्य आरोपी तुषार पडवळ हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
या कारवाईत उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत व्यवहारे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज खरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली.
स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका:
एवढ्या मोठ्या प्रमाणात (४५६ किलो) गांजा शहरालगत सापडणे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. विशेष म्हणजे, नाशिकचे पथक थेट संगमनेरात येऊन कोट्यवधी रुपयांचा गांजा पकडते, पण स्थानिक संगमनेर शहर पोलिसांना याबाबत कानोकान खबर नसणे, यावर आता जोरदार टीका होत आहे. अनेक अवैध धंद्यांना अभय देऊन ‘मोठ्या माशांना’ वाचवण्यासाठी आणि ‘छोट्या माशांना’ गळाला लावून किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्याचे प्रकार शहरात वाढत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. फरार आरोपी, चैन स्नॅचिंग, दरोड्याचे गुन्हे अद्यापही उलगडलेले नसताना, सव्वा कोटीचा गांजा पकडण्यासाठी बाहेरच्या पथकाला यावे लागणे, हे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.
नार्कोटिक्स विभागाने आता फरार आरोपी पडवळ याच्यासह या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, हा माल कोणाकडून येत होता आणि कोणाला पुरवला जात होता, याचा सखोल तपास सुरू केला आहे.
