Wed. Apr 1st, 2026

संगमनेर (प्रतिनिधी):

अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोहारे-मिरपूर येथील श्रीक्षेत्र आवजीनाथ बाबा देवस्थान परिसरात भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी नांदूर शिंगोटे-कोल्हार या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे मागणी केली असून दूरध्वनीवरूनही सकारात्मक चर्चा केली आहे.

संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील श्रीक्षेत्र आवजीनाथ बाबा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या पाठपुराव्यातूनच मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि विविध विकासकामांसह गेल्या वर्षी ५० लाख रुपयांच्या निधीतून सुसज्ज भक्त निवासाची उभारणी करण्यात आली आहे. या सोयीसुविधांमुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून दरवर्षी दोन वेळा भरणाऱ्या यात्रेनिमित्त येथे लाखो भाविकांची मांदियाळी असते.

सध्या नांदूर शिंगोटे ते कोल्हार या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा रस्ता मंदिराच्या अगदी जवळून जात असल्याने मंदिर परिसरातील मोकळी जागा कमी होणार आहे. वाढती गर्दी आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक यामुळे भविष्यात येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघातांचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक नागरिक आणि भाविकांनी लक्ष वेधल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी तातडीने दखल घेत केंद्रीय मंत्र्यांकडे धाव घेतली आहे.

आमदार तांबे यांनी नितीन गडकरी यांना विनंती केली आहे की, सुरू असलेल्या चौपदरीकरण प्रकल्पातच मिरपूर येथील उड्डाणपुलाचा समावेश करण्यात यावा, जेणेकरून महामार्गावरील वाहतूक विनासायास सुरू राहील आणि खालील बाजूस भाविकांना सुरक्षितपणे वावरता येईल. या मागणीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या या विशेष पाठपुराव्याबद्दल लोहारे, मिरपूर व तळेगाव परिसरातील ग्रामस्थांनी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार तांबे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!