Sat. May 30th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन – जवळा

पारनेर तालुक्यातील जवळा येथील ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज यांचा वार्षिक बीजोत्सव मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी मोठ्या भक्तिभावात आणि अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. यंदाचा उत्सव तब्बल तीन दिवस चालला असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण जवळा नगरी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली होती.

विशेष म्हणजे, लोकसहभागातून सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याने यंदाच्या सोहळ्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. जहागिरदार कै. जिजाबा माधवराव सोमवंशी यांनी पूर्वी मंदिराची उभारणी केली होती, त्याच परंपरेचा वारसा जपत त्यांचे पणतू राहुल दिलीपराव सोमवंशी यांच्या पुढाकारातून मंदिर चौथाऱ्याची पुनःस्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे मंदिराच्या मूळ वैभवात मोठी भर पडली आहे.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे जहागिरदार वाड्यातून श्रींच्या पादुकांची व प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली, त्यानंतर मुख्य मूर्तीचा अभिषेक व महाआरती झाली. तीन दिवसांच्या या सोहळ्यात भजन, कीर्तन, भव्य छबिना, बैलगाडी शर्यती आणि कुस्तीचे जंगी मैदान अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कुस्तीच्या मैदानात परिसरातील नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवला, तर रात्री पार पडलेल्या लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक खेळ आणि लोककलेच्या सादरीकरणामुळे यात्रेला एक विशेष रंगत प्राप्त झाली होती.

या सोहळ्याला आमदार काशिनाथ दाते सर यांच्यासह परिसरातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून श्री धर्मनाथ महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी मान्यवरांनी मंदिर जीर्णोद्धाराच्या भव्य कार्याचे आणि जवळा ग्रामस्थांच्या एकजुटीचे विशेष कौतुक केले.

पारनेर तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो भाविकांनी तीनही दिवस दर्शनासाठी गर्दी केली होती. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी, मंदिर जीर्णोद्धार समिती, देवस्थान सेवेकरी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले, तर ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांसाठी चोख सुविधा पुरवण्यात आल्या होत्या.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!