संगमनेर – विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील तांडा वस्त्यांच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत तालुक्यात विविध विकासकामांसाठी तब्बल ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीमुळे संगमनेर तालुक्यातील वंचित वस्त्यांचा विकास लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होईल.
आमदार तांबे यांनी ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी इतर मागास प्रवर्ग व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे तालुक्यातील एकूण ३३ कामांसाठी १०० लाख रुपयांची (एक कोटी) मागणी केली होती. या कामांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि स्ट्रीटलाईट बसवण्याच्या कामांचा समावेश होता.
या मागणीची शासनाने तात्काळ दखल घेतली. त्यानंतर, जलदगतीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन तांबे यांनी मागणी केलेल्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यासाठी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंजूर झालेल्या कामांमध्ये संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर, शिंदोडी, शेडगाव, चिंचपूर, घुलेवाडी, जांबूत, दरेवाडी, रणखांब, वेल्हाळे, साकुर, बिरेवाडी, पिंपरणे, कौठे मलकापूर, तिगाव यासह अन्य गावांचा समावेश आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी विश्वास व्यक्त केला की, तालुक्यातील प्रत्येक वस्तीपर्यंत पायाभूत सुविधा पोहोचवणे हे माझे ध्येय आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वाहतूक सोयी मिळतील, शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीत सुलभता येईल आणि ग्रामीण भागाच्या जीवनमानाला मोठी चालना मिळेल.
