मुंबई:
मराठी भाषेच्या चळवळीतील खंबीर नेतृत्व आणि मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. दीपक पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
प्रा. पवार हे मराठीला राजभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्यासाठी, तसेच शिक्षणात मराठीच्या सक्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांनी नेहमीच सरकारच्या धोरणांमधील फोलपणा उघड केला आहे. केवळ मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका केली म्हणून त्यांना ‘अर्बन नक्षल’ ठरवणे, हा भाजप आणि फडणवीस सरकारचा लोकशाही हक्क दडपण्याचा कट असल्याचे ‘माकप’ने म्हटले आहे.
राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठीला केवळ अभिजात भाषेच्या नावाने इतिहासाच्या देव्हाऱ्यात बंद करण्याचे संघ परिवाराचे उद्दिष्ट आहे. मात्र, मराठी भाषिकांचे रोजगाराचे आणि जगण्याचे प्रश्न अस्मितेशी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य प्रा. पवार करत आहेत.
जन सुरक्षा विधेयकासारख्या कायद्यांचा वापर करून सरकारविरोधी आवाज दाबला जात असून, प्रा. पवार यांच्यावरील आरोप हे त्याच कारस्थानाचा भाग आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रा. पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून, मराठी कार्यकर्त्यांचा आवाज बंद करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना सक्रिय विरोध केला जाईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.


