संगमनेर: संगमनेर तालुक्यात अमली पदार्थ आणि ड्रग्सची वाढती तस्करी हे अत्यंत चिंताजनक असून, यामागे ‘हप्तेखोरी’ हे एकमेव कारण असल्याची थेट टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. थोरात यांनी ‘हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरून’ तालुक्यात काळे धंदे चालवणाऱ्या लोकांवरही सडकून टीका केली.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, रणजीतसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, कांचनताई थोरात, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, डॉ. जयश्रीताई थोरात, शंकरराव खेमनार, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात यांनी गंभीर चिंता व्यक्त करत सांगितले की, संगमनेरमध्ये ड्रग्स, अमली पदार्थ, इंजेक्शन आणि लिक्विड यांसारख्या गोष्टी आता सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. जे लोक शेजारील तालुक्यांमध्ये होते आणि त्यांनी तेथील तरुणाई उद्ध्वस्त केली, ते आता संगमनेरकडे वळू लागले आहेत. या वाढलेल्या तस्करीमागील एकमेव कारण सुरू झालेली हप्तेखोरी आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
गेली चाळीस वर्षे आपण हा तालुका परिवार म्हणून सांभाळला आणि वाईट प्रवृत्तींना थारा दिला नाही. आपण वारकरी संप्रदायाचे आणि पुरोगामी विचारांचे पाईक आहोत. मात्र, आता कधी न दिसणारे लोक हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरून धर्माच्या नावावर काळे धंदे आणि अमली पदार्थांची तस्करी करत आहेत. काही लोकांनी सोपे राजकारण स्वीकारले आहे; कोणतेही काम न करता भगवी टोपी घालायची आणि फिरायचे.
ते म्हणाले की, गुन्हेगाराला जात-धर्म नसतो, तो केवळ गुन्हेगार असतो. मात्र, आता धर्माच्या नावावर गावोगावी गुंड तयार झाले असून, दहशतवाद वाढला आहे. थोरात यांनी प्रशासनाकडे या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. तरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या अशा गुन्हेगारांवर आणि त्यांच्या मागे असलेल्या संरक्षण देणाऱ्या शक्तींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे ते ठामपणे म्हणाले.
या वाढत्या अमली पदार्थ तस्करीमुळे तरुण पिढीचे भविष्य अत्यंत चिंताजनक बनले आहे. यामुळे सर्व संगमनेरकरांनी आपल्या पाल्यांच्या बाबत अधिक सतर्क राहावे आणि तरुणांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडून भरकटून जाऊ नये, असे कळकळीचे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.