संगमनेर:
येथील माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते यांनी नाशिकमधील नाथ संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या अवघडपीर सतनाथजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
सातपुते यांनी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाविक आणि शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत होता.


या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी पक्ष सचिव विनायक राऊत यांची भेट घेऊन त्यांना व्हिडिओ पुराव्यासह सर्व माहिती दिली. या पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सातपुते यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली.
शिवसेना नेहमीच साधु-संतांचा आदर करणारा पक्ष असून, अशा प्रकारच्या गैरवर्तनाचे कधीही समर्थन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईद्वारे देण्यात आला आहे.
