संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ सुवर्णा संदीप खताळ यांच्या उमेदवारी अर्जावर नगराध्यक्षपदाच्या दुसऱ्या अपक्ष उमेदवार सुषमा तवरेज यांनी कायदेशीर आक्षेप नोंदवला आहे. हा आक्षेप थेट ‘दुहेरी मतदार नोंदणी’ संबंधित असल्याने मोठी खळबळ उडाली असून, खताळ यांच्या उमेदवारीची वैधता धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
श्रीमती सुषमा तवरेज यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण मुंडे यांच्याकडे नोंदवलेल्या आक्षेपानुसार, सुवर्णा खताळ यांचे नाव एकाच वेळी दोन वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीत समाविष्ट आहे.
तक्रारदार तवरेज यांनी दोन्ही ठिकाणच्या मतदार नोंदणीचा तपशील सादर केला आहे. एक नोंदणी संगमनेर नगरपालिका मतदार यादीत (भाग क्र. १५७, अनुक्रमांक क्र. ३३९) असून, तिचा पत्ता South North Building Room No.4 From North, sir DM Petit Highschool, Akole bypas road Sangamner असा आहे. तर दुसरी मतदार नोंदणी घुलेवाडी मतदार यादीत (भाग क्र. ५२, अनुक्रमांक क्र. ३३९) असून, तिचा पत्ता East west Building Room No.3 from East. Sau Mathurabai Bhausaheb Thorat Madhyamik Vidyalaya Ghulewadi येथे आहे.
आक्षेपकर्त्या सुषमा तवरेज यांनी याकडे लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० चे कलम १७ आणि १८ नुसार गंभीर कायद्याचे उल्लंघन म्हणून पाहिले आहे. या कलमांनुसार, एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा जास्त मतदार यादीत असणे हे कायद्याचे उल्लंघन मानले जाते आणि अशा परिस्थितीत उमेदवारी अर्ज अवैध ठरवला जाऊ शकतो.
तवरेज यांनी पत्राद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तातडीने मागणी केली आहे की, सदर उमेदवाराने दोन ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार मिळवून कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी त्वरित अपात्र ठरवावी.
या गंभीर आक्षेपामुळे आता सर्वांचे लक्ष निवडणूक निर्णय अधिकारी अरुण मुंडे यांच्या निर्णयाकडे लागले आहे. दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीतील तपशील सादर करण्यात आले असल्याने, अधिकारी या आक्षेपावर काय निर्णय घेतात आणि शिवसेनेच्या श्रीमती सुवर्णा खताळ यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे भवितव्य काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Screenshot 