Wed. Apr 1st, 2026

संगमनेर – लक्ष लागून राहिलेल्या संगमनेर नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा एक मोठा आणि अनपेक्षित ‘ट्विस्ट’ आला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला थेट आमदार अमोल खताळ यांच्याकडून आव्हान मिळत असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी ‘स्वतंत्र’ उमेदवार म्हणून जोरदार दावेदारी केल्याने ही लढत आता ‘त्रिकोणी’ झाली आहे.

बानोबी शेख या ‘ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’च्या जिल्हा महिला अध्यक्ष असून, गेली अनेक वर्षे त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न, स्त्रीभ्रूणहत्या विरोधी मोहिम, शिक्षण आणि मानवी मूल्यांचे जतन यांसाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या शेख यांचा समाजात मोठा संपर्क आहे.

नगरपरिषद अध्यक्षपदासाठी जरी १५ महिला उमेदवारांनी अर्ज भरले असले तरी, बहुतेक उमेदवार कुठल्या ना कुठल्या राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातून आहेत आणि त्यापैकी अनेकांच्या माघारीची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, ‘नो पार्टी’ फॅक्टर घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या बानोबी शेख यांची एंट्री महत्त्वपूर्ण ठरली आहे.

संगमनेर शहरात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेसचे हे पारंपरिक मतदार मानले जातात. मात्र, बानोबी शेख यांची सामाजिक कामाची पार्श्वभूमी आणि मुस्लिम महिलांमध्ये असलेले त्यांचे मजबूत स्थान पाहता, त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे पारंपरिक मुस्लिम मतदान विभाजित होण्याची दाट शक्यता आहे. या मतविभाजनाचा अप्रत्यक्ष फायदा विरोधी पक्षांना, विशेषतः आमदार अमोल खताळ यांच्या समर्थकांना, होण्याची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे.

थोडक्यात, थोरात-तांबे विरुद्ध अमोल खताळ यांच्या थेट राजकीय लढतीत आता सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांच्या रूपाने एक नवा आणि महत्त्वाचा घटक सामील झाला आहे. संगमनेर नगरपरिषदेचा विजय सामाजिक कार्याचा होतो की राजकीय वारशाचा, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!