संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा नुकसान भरपाई न मिळाल्यास थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
गत खरीप हंगामातील पीकविमा भरपाई अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये वाटप झाली असताना, संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यातून अन्यायकारक रीतीने वगळण्यात आले आहे. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते, मात्र महसूल व कृषी विभाग प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात न जाता केवळ टेबलावर बसून हलगर्जीपणे पंचनामे केल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील उंबरठा उत्पादन प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा जास्त दाखविले गेले आणि यामुळेच येथील शेतकरी पीकविमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत. या अन्यायाविरुद्ध शेतकरी संघटनेने यापूर्वी जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन दिले होते, परंतु त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
त्यामुळे आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यामार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे. येत्या २९ मे पर्यंत तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविमा नुकसान भरपाई जमा न झाल्यास, संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
हे निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.


