संगमनेर:
उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या शेजाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. नाशिकजवळील हरसूल-त्र्यंबकेश्वर मार्गावरील कश्यपी धरणाच्या जलाशयात बुडून एकाच परिसरातील चौघांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेत मूळचे संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रहिवासी असलेले व सध्या नाशिकच्या मखमलाबाद भागात राहणारे सचिन कैलास ठोंबरे, त्यांच्या पत्नी रोहिणी ठोंबरे आणि शेजारी राहणारे केतन अनिल पवार (१६) व कौशल अनिल पवार (१४) या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास हे सर्वजण कश्यपी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. धरणाचा विस्तीर्ण जलाशय पाहून ते पाण्यात उतरले, मात्र खोलीचा अंदाज न आल्याने एकजण बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर तिघेजणही एकापाठोपाठ एक पाण्यात ओढले गेले आणि चौघांचाही बुडून मृत्यू झाला.
या संपूर्ण थरारात ठोंबरे दांपत्याची दोन वर्षांची चिमुरडी मुलगी काठावर एकटीच पाण्याच्या दिशेने जात असताना संगीता घाडगे या महिलेच्या निदर्शनास आली. त्यांनी प्रसंगावधान राखून धाव घेत त्या चिमुरडीला सुखरूप बाजूला केले. मुलगी रडत रडत पाण्याच्या दिशेने बोट दाखवत असल्याने आणि काठावर चपलांचे जोड दिसल्याने घाडगे यांनी तातडीने आरडाओरड करून स्थानिकांना मदतीसाठी बोलावले. कुस्तीच्या स्पर्धेसाठी जमलेल्या स्थानिक तरुणांनी तात्काळ पाण्यात उड्या मारून चौघांचेही मृतदेह बाहेर काढले.
मृत महिलेच्या मोबाईलवर आलेल्या फोनवरून त्यांची ओळख पटली. या घटनेमुळे संगमनेरचे पिंपरणे गाव आणि नाशिकच्या मखमलाबाद परिसरात तीव्र शोककळा पसरली असून, आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या त्या चिमुरडीबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
