Fri. May 29th, 2026

संगमनेर / प्रतिनिधी

तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ लोककलावंत तथा तमाशा महर्षी रघुवीर खेडकर यांना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात आला. ही संगमनेरकरांसाठी अत्यंत गौरवाची बाब असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.

आमदार खताळ यांच्या पाठपुराव्यामुळेच ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची माहिती खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष आणि संगमनेरचे सुपुत्र रघुवीर खेडकर यांनी आपल्या असामान्य कलागुणांच्या जोरावर तमाशा ही लोककला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर थेट दिल्ली सारख्या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठांवरही प्रभावी सादरीकरण करून या पारंपरिक लोककलेचा झेंडा उंचावला आहे.

त्यांनी अनेक वर्षे राज्य व केंद्र शासनाकडून सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली जात नसल्याची भावना त्यांची झाली होती. परंतु संगमनेर तालुक्यातील राजकीय परिवर्तनानंतर त्यांनी या पुरस्कारासाठी आमदार अमोल खताळ यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यानंतर आमदार खताळ यांनी महाराष्ट्र शासन स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा सुरू केला.

तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सांस्कृतिक मंत्री उदय सामंत संगमनेर येथे आले होते. त्यावेळी आमदार खताळ यांनी मंत्री सामंत यांच्याकडे रघुवीर खेडकर यांच्या नावाची शिफारस करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून सांस्कृतिक विभागामार्फत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

या पाठपुराव्याला यश मिळत अखेर रघुवीर खेडकर यांना देशातील प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान स्वीकारताना संपूर्ण संगमनेर तालुक्यासह महाराष्ट्रातील तमाशा रसिकांसाठी तो अभिमानाचा क्षण ठरला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

रघुवीर खेडकर यांनी आयुष्यभर तमाशा कलेसाठी संघर्ष केला. ग्रामीण संस्कृती, लोकपरंपरा आणि महाराष्ट्राची ओळख देशभर पोहोचवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या सन्मानामुळे केवळ संगमनेरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाशा कलेची मान उंचावली आहे. – अमोल खताळ (आमदार)

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!