संगमनेर:
पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या वेदांत वाईन्ससमोर ग्राहकांच्या वाहनांची बेशिस्त पार्किंग, वाहतुकीस होणारा अडथळा आणि परिसरात पसरवलेली अस्वच्छता या कारणांमुळे संगमनेर नगरपरिषदेने या वाईन्स दुकान व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, प्रशासनाने या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या वाईन्स दुकानासमोर दररोज सायंकाळी मद्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते आणि ही वाहने थेट रस्त्यावरच उभी केली जात असल्याने या वर्दळीच्या मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच काही तळीरामांकडून परिसरात गोंधळ घातला जात असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे आल्या आहेत. याशिवाय दुकानाचा दैनंदिन घनकचरा नगरपरिषदेच्या घंटागाडीत न देता सार्वजनिक ठिकाणी टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत नगरपरिषदेने वाईन्स व्यवस्थापनाला गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याचे आणि वाहनतळाचे योग्य नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी संबंधित प्रशासनाने तीन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले असून, खुलासा समाधानकारक न आढळल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिशीत म्हटले आहे.
तसेच नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यास वाईन्सचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन घेतला जाईल आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल, असा सज्जड इशारा मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिला आहे.
