Fri. Jun 5th, 2026

खामुंडी (प्रतिनिधी): 

संगमनेरचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांनी जुन्नर तालुक्यातील ओतूरनजीक असलेल्या ऐतिहासिक आणि प्राचीन श्री क्षेत्र खामुंडी येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानास सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार खताळ यांनी काळभैरवनाथ महाराजांचे मनोभावे दर्शन घेऊन आरतीला हजेरी लावली. या प्रसंगी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आमदार अमोल खताळ यांचा शाल, श्रीफळ आणि काळभैरवनाथांची आकर्षक प्रतिमा भेट देऊन यथोचित व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

यावेळी देवस्थानचे खजिनदार मारुती कदम, विश्वस्त गणपत कोकाटे, विश्वस्त शहाजी जाधव, विश्वस्त अरुण बोडके, विश्वस्त हरिचंद्र खोकराळे, सह्याद्री अकॅडमीचे मयूर डुंबरे, पत्रकार कैलास बोडके, केशव क्षीरसागर तसेच देवस्थानचे व्यवस्थापक बबनराव डुंबरे यांसह परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दर्शनानंतर उपस्थितांशी संवाद साधताना आमदार अमोल खताळ यांनी खामुंडी गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि देवस्थान ट्रस्टच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे मनापासून कौतुक केले. खामुंडी गावाची खरी ओळख हे स्वच्छ, सुंदर आणि अत्यंत जिवंत देवस्थान म्हणून आहे, असे सांगत गावकऱ्यांनी एकत्र येऊन काळभैरवनाथ महाराजांची जी निस्सीम सेवा केली आहे, त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत एक अतिशय पवित्र आणि आध्यात्मिक वातावरण तयार झाले असल्याचे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी यावेळी काढले.

नगर-कल्याण महामार्गावर सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले श्री काळभैरवनाथ देवस्थान हे खामुंडी गावाचे श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत आहे. सुमारे ७०० वर्षांची प्रदीर्घ आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेले हे स्वयंभू देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिरात दररोज पहाटे ३ वाजता आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी अत्यंत भक्तीमय वातावरणात महाआरती संपन्न होते. येथील काळभैरवनाथांना ‘काशीचे सिद्धनाथ’ असेही संबोधले जाते. आपल्या भक्तांना विजय प्राप्त करून देणारे, सर्व संकटांचा नाश करून अभय देणारे आणि नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या मंदिराची मोठी ख्याती आहे.

क्षेत्र खामुंडी येथे दरवर्षी आयोजित होणारी काळभैरवनाथ यात्रा, पालखी सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह यांसारखे धार्मिक उत्सव अतिशय उत्साहात आणि भक्तीभावाने साजरे केले जातात. यामुळेच केवळ स्थानिक पंचक्रोशीतीलच नव्हे, तर मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे यांसारख्या विविध जिल्ह्यांतून हजारो भाविक वर्षभर काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी येथे हजेरी लावतात. दिवसेंदिवस या देवस्थानची महती आणि ख्याती सर्वदूर पसरत असल्याने, राज्यभरातून येणाऱ्या भाविकांचा ओढा आता मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!