Fri. May 29th, 2026

संगमनेर प्रतिनिधी:

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग, श्रीरामपूरच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष आरटीओ कॅम्पमध्ये आमदार अमोल खताळ पाटील यांनी बुधवारी अचानक धाड टाकली.

या कॅम्पमध्ये एजंटांमार्फत सर्वसामान्य वाहनचालकांकडून अवाजवी पैसे उकळले जात असल्याच्या आणि त्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार खताळ यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदारांनी थेट कॅम्पच्या ठिकाणी जात परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वडगाव पान साठवण तलावातून २१ गावांना पाणी सोडण्याच्या कार्यक्रमासाठी आमदार अमोल खताळ आले होते. हा कार्यक्रम आटोपून संगमनेरकडे परतत असताना, त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आपला मोर्चा थेट आरटीओ कॅम्पकडे वळवला.

आमदार खताळ अचानक कॅम्पमध्ये दाखल झाल्याचे पाहताच तेथील आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमालीची तारांबळ उडाली. शासनाच्या अधिकृत सेवांसाठी नागरिकांना एजंटांच्या दारात जावे लागणे आणि त्यांची आर्थिक लूट होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत, सर्वसामान्य वाहनचालकांची अडवणूक तातडीने बंद झाली पाहिजे, असे सक्त निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागता कामा नये, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. आमदार खताळ यांच्या या तडकाफडकी कारवाईचे उपस्थित वाहनचालकांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे.

परिवहन मंत्र्यांशी थेट संपर्क; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन

या धाडीदरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार अमोल खताळ यांनी थेट आरटीओ कॅम्पच्या स्थळावरूनच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन लावला. त्यांनी परिवहन विभागाच्या कामकाजात तातडीने सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगत, संगमनेर येथे स्वतंत्र परिवहन कार्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, ज्या अधिकाऱ्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी आमदार खताळ यांना फोनवरून दिली.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!