संगमनेर:
सूरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनींना अत्यंत कमी मोबदला मिळाल्यामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर वाढीव व न्याय्य मोबदला देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते.
तालुक्यातील वडझरी बु., अजमपूर, आरामपूर, चिंचोली गुरव, हसनाबाद आणि तळेगावसह अनेक गावांमधील निळवंडे कालव्याच्या सिंचनाखालील सुपीक व बागायती जमिनी या महामार्गासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. सन २०२१-२२ मध्ये जाहीर झालेला भूसंपादनाचा निवाडा प्रत्यक्ष बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी असून, काही ठिकाणी तो प्रतिएकर दहा लाख रुपयांपेक्षाही कमी आहे.
स्थानिक बाजारभाव प्रतिएकर २५ ते ३० लाख रुपये असताना, मिरपूर येथील एका शेतकऱ्याला २४ गुंठ्यांसाठी केवळ ५ लाख ९ हजार रुपये मंजूर झाले आहेत. या अल्प रकमेत इतरत्र पर्यायी जमीन खरेदी करणे शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे.
राज्यात समृद्धी महामार्ग आणि पालखी मार्गासाठी शेतकऱ्यांना बाजारभावाच्या अनेक पटीने मोठी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मात्र, संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत वेगळा न्याय लावल्याने समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
भूसंपादनामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आधार हिरावला जात असल्याने, शासनाने ‘फेअर कम्पेन्सेशन अॅक्ट २०१३’ मधील तरतुदींनुसार बाजारभावाच्या चारपटपर्यंत वाढीव मोबदला देऊन जमिनींचे फेरमूल्यांकन करावे, अशी आग्रही मागणी आमदार खताळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


