Fri. Jun 5th, 2026

संगमनेर:

शहरातील पेटीट सर्कल परिसरातील वाहतुकी कोंडी फोडण्यासाठी नगरपालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी धडक कारवाईदरम्यान गुरुवारी मोठा राडा झाला. पालिकेच्या अधिकृत कारवाईला विरोध करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि पालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. या वादामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पेटीट सर्कल भागातील भाजी व फळ विक्रेत्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने मेडिकव्हर हॉस्पिटलसमोरील जागेत शेड उभारून ३८ विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली होती. यासाठी आधीच पूर्वसूचना व नोटिसा देण्यात आल्या होत्या, मात्र काही विक्रेत्यांनी नव्या जागेवर जाण्यास नकार देत जुन्याच ठिकाणी व्यवसाय करण्याचा हट्ट धरला. अखेर अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात थेट कारवाई सुरू केली.

कारवाई सुरू होताच संतप्त विक्रेत्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत अर्धा तास रस्ता रोखून धरल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यादरम्यान अतिक्रमण विभागाचे कर्मचारी महेश बोर्डे यांना दोन संशयितांनी दमदाटी करत मारहाण केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

कर्मचारी महेश बोर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शुभम ढोले आणि विलास पंधारे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे, दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पर्यायी जागेला विनाकारण विरोध केल्यामुळेच ही कारवाई करावी लागली असून, यापुढे संबंधित मार्गावर रस्त्याच्या कडेला व्यवसाय केल्यास अधिक कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिला आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!