संगमनेर शहराला स्वातंत्र्यलढ्याचा एक अतिशय तेजस्वी आणि गौरवशाली वारसा लाभला आहे. शहराच्या इतिहासात अनेक अशा घटनांची नोंद आहे, ज्यांनी देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली. याच ऐतिहासिक परंपरेचा एक अविभाज्य भाग म्हणजे संगमनेरचा ‘हनुमान विजय रथोत्सव’. या रथोत्सवामागे केवळ धार्मिक भावनाच नाही, तर ब्रिटीश सत्तेच्या विरोधात पुकारलेल्या संघर्षाची एक अत्यंत प्रेरणादायी गाथा दडलेली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सरकार भारतीयांचे संघटन मोडून काढण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत असे. त्याकाळी सरकारी यंत्रणेतील काही अधिकारी सर्वसामान्य लोकांची मुस्कटदाबी करण्यात मग्न होते. याच दडपशाहीचा फटका हनुमान जयंतीच्या रथाला बसला होता. सन १९२७ आणि १९२८ या दोन वर्षी इंग्रज सरकारने रथाच्या मिरवणुकीवर अटकाव आणला होता. १९२७ मध्ये इंग्रजांच्या धाकामुळे रथ निघूच शकला नाही, तर १९२८ मध्ये जेव्हा रथ रंगार गल्लीतील सोमेश्वर मंदिरापर्यंत पोहोचला, तेव्हा ‘तांबे’ नावाच्या मामलेदाराने या मिरवणुकीला सक्त विरोध केला. परिणामी, हा रथ आठ दिवस सोमेश्वर मंदिरापाशीच अडकून पडला. अशा परिस्थितीत काय करावे, हा मोठा प्रश्न रंगार गल्ली तालीम संघाच्या कार्यकर्त्यांसमोर होता.
या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी तालीम संघाचे वस्ताद सखाराम बुवा अवसक यांनी अखेर रथाची मिरवणूक कोणत्याही परिस्थितीत काढण्याचा निर्धार केला. इंग्रजांच्या दडपशाहीला सामोरे जाण्यासाठी गनिमी काव्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सखाराम बुवांनी अत्यंत चाणाक्षपणे रात्रीच घरातील सर्व महिलांना पहाटे नदीवर जाण्यापूर्वी एकत्र होण्याचा निरोप दिला. या मोहिमेची धुरा झुंबराबाई अवसक यांनी आपल्या खांद्यावर घेतली. ठरल्याप्रमाणे पहाटेच्या वेळी झुंबराबाईंच्या नेतृत्वाखाली महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन मिरवणुकीला सुरुवात केली.
महिलांचे हे पाऊल पाहून ब्रिटीश पोलीस चक्रावून गेले आणि काही कळायच्या आत तालीम संघाच्या कार्यकर्त्यांनी रथाची धुरा हाती घेतली. झुंबराबाईंच्या नेतृत्वातील या ध्येयवेड्या महिलांनी आणि तालीम संघाच्या कार्यकर्त्यांनी ब्रिटीश सत्तेला आव्हान देत हनुमान विजय रथाची मिरवणूक यशस्वीपणे पूर्ण करून रथ पुन्हा आपल्या मूळ स्थानी पोहोचवला.
हा ऐतिहासिक वारसा संगमनेरकर आजही तितक्याच अभिमानाने आणि मोठ्या उत्साहात जपत आहेत. आजही दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी पोलीस पथकाकडून रणरागिणी झुंबराबाई अवसक यांना सलामी दिली जाते. विशेष म्हणजे, रंगार गल्ली परिसरातील महिला आणि युवक कार्यकर्त्यांनी मिळून एक अतिशय स्तुत्य पायंडा पाडला आहे. त्यांनी रणरागिणी झुंबराबाई अवसक यांची प्रतिमा रथात विराजमान करून मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढली आणि त्यानंतर पोलीस पथकाने ध्वजवंदन करून या ऐतिहासिक सोहळ्याची अधिकृत सुरुवात केली.
हा ऐतिहासिक संदर्भ केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणारा नाही, तर तो पुढच्या पिढ्यांसाठी एक दिशादर्शक ठेवा आहे. महिलांचा हा उत्स्फूर्त सहभाग आणि युवक कार्यकर्त्यांचा पुढाकार खऱ्या अर्थाने या गौरवशाली परंपरेला जिवंत ठेवणारा आहे. हा नवा पायंडा भविष्यातही कायम राहील, यात शंका नाही. संगमनेरच्या मातीतील हा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नसून, तो ब्रिटीश सत्तेविरुद्ध पुकारलेल्या बंडाची आणि भारतीय स्त्रीशक्तीच्या पराक्रमाची एक गौरवगाथा आहे.
रजत अवसक, संगमनेर


