Sat. May 30th, 2026

संगमनेर: 

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोषित, वंचित आणि शेतकरी वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडत जगाला समता व बंधुतेचा विचार दिला असून, सर्वधर्मसमभाव जोपासणारा त्यांचा हा मानवतावादी विचारच देशाला प्रगतीच्या पथावर पुढे नेणारा आहे, असे प्रतिपादन जय हिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, ॲड. निशा शिवूरकर, डॉ. नामदेव गुंजाळ, अमजद पठाण यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. तांबे पुढे म्हणाले की, भारतीय लोकशाही आणि राज्यघटनेचा पाया हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारलेला आहे. देशातील जातीभेद मिटवून सामाजिक सलोखा राखण्यासाठी या महापुरुषांच्या विचारांची आज देशाला नितांत गरज आहे.

दुर्गाताई तांबे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी सतीची चाल आणि केशवपन यांसारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध बंड पुकारले व सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका बनवून स्त्री शिक्षणाची दारे उघडली, ज्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रांत प्रगती करत आहेत.

या निमित्ताने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयातही महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेश थोरात, प्रा. बाबा खरात, डॉ. नितीन भांड, रामदास तांबडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला.

दरम्यान, महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणला आणि शिक्षणाची क्रांती घडवली, हाच वारसा जपण्यासाठी संगमनेरमध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी केली.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!