Sat. Jun 13th, 2026

संगमनेर:

नाशिक-पुणे हायवेवर पिकअप चालकाला शस्त्रांचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या संघटित टोळीविरुद्ध संगमनेर पोलिसांनी अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. आर्थिक फायद्यासाठी सातत्याने गंभीर गुन्हे करणाऱ्या या टोळीवर नवीन कायद्यानुसार ‘भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३’ चे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) हे वाढीव कलम लावण्यात आले असून, श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या टोळीचा म्होरक्या अक्षय दादा चव्हाण याच्यासह त्याच्या पाच साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

२८ एप्रिल २०२६ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास संगमनेरमधील डी-मार्टजवळ ही घटना घडली होती. निफाड येथील पिकअप चालक शैलेश नारायण शेलार हे माल घेऊन नाशिकहून चेन्नईकडे जात असताना, सहा जणांनी चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. आरोपींनी शेलार यांना बेदम मारहाण करत लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून ९५,५०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने लुटून नेला होता. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपासात अक्षय दादा चव्हाण, रोहित उर्फ कोकण भिकाजी शिंदे, संदिप उर्फ जब्या संजय वाल्हेकर, आदित्य संजय शिंदे, अभिषेक अशोक लोंढे आणि साई रामपुरी गोसावी हे सहा आरोपी निष्पन्न झाले असून, यातील पहिल्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीची पार्श्वभूमी तपासली असता त्यांच्यावर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे एकूण ३० गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. यामध्ये संदिप वाल्हेकरवर १५, अक्षय चव्हाणवर ८ तर रोहित शिंदेवर ६ गुन्हे दाखल आहेत.

या टोळीने परिसरात दहशत निर्माण केल्यामुळे संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांनी या टोळीविरुद्ध संघटित गुन्हेगारीचे (कलम १११) कलम लावण्याचा प्रस्ताव पाठवला होता, ज्याला अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी मंजुरी दिली. नवीन कायद्यातील हे कलम पूर्वीच्या ‘मोक्का’ कायद्याप्रमाणेच असून, यामध्ये कडक शिक्षेची तरतूद आहे. ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत आणि त्यांच्या पथकाने केली असून, यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!