संगमनेर:
संगमनेरमधील सुकेवाडी कुरण रस्त्यावर बुधवार, ३ जून रोजी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. बँकेतून पैसे काढून घराकडे निघालेल्या ६९ वर्षीय वृद्ध शेतकरी सुरेश बाळकृष्ण शेटे यांचे लक्ष विचलित करून दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या स्कूटीला लटकवलेली पैशांची पिशवी चोरून नेली. या पिशवीत १ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे ३ लाख रुपयांचे सह्या केलेले दोन धनादेश होते.
सुकेवाडी येथील रहिवासी असलेल्या सुरेश शेटे यांनी बँक ऑफ बडोदामधून १ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश वटवला होता. ही रोकड आणि इतर दोन धनादेश त्यांनी आपल्या जेवणाच्या डब्याच्या पिशवीत ठेवले होते. ते ॲक्टिव्हा स्कूटीवरून कुरण रस्त्याने घराकडे जात असताना, पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी ‘तुमचे पैसे आणि मोबाईल खाली पडला आहे’ असे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले. शेटे यांनी पाठीमागे पाहताच चोरट्यांनी हँडलला लटकवलेली पिशवी हिसकावून अवघ्या काही सेकंदांत पळ काढला.
पैसे चोरीला गेल्याचे समजताच शेटे यांनी तातडीने संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून बँकेतील व्यवहार थांबवल्यामुळे धनादेशांचा गैरवापर टळला. चोरट्यांनी बँकेपासूनच त्यांच्यावर पाळत ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मुंढे पुढील तपास करत आहेत.
