Sat. Jun 13th, 2026

संगमनेर:

संगमनेर न्यायालय परिसरात एका अटक आरोपीच्या समर्थनार्थ बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन परिसरात गोंधळ घालून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यामुळे या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

सोमवारी (८ जून) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी शिवार येथील संगमनेर न्यायालयाच्या परिसरात ही घटना घडली. पोलीस काँस्टेबल चंद्रकांत विठ्ठल सदाकाळ हे एका आरोपीला न्यायालयात हजर करत असताना, तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी आरोपीचे व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी न्यायालय परिसरातच बेकायदेशीर घोळका तयार करून गोंधळ घातला. इतक्यावरच न थांबता, आरोपीला न्यायालयाबाहेर आणले जात असताना या जमावाने “आयेगा तो अपना राज, सागर पगारे संगमनेर का बॉस” अशा घोषणा देऊन त्याच्या गुन्हेगारी कृत्याचे जाहीर समर्थन केले.

याप्रकरणी पोलिसांनी यश सुनील धात्रक, रितेश शाम बिडवे, आनंद गांधी आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर २० ते २५ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९, १९०, १९१ आणि १९२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बारवकर आणि पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलीस हेड काँस्टेबल अशोक पारधी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!