संगमनेर:
अध्यात्मावर बोलणे आणि त्याचा उपदेश करणे सोपे असते, मात्र त्यानुसार प्रत्यक्ष जीवन जगणे अत्यंत कठीण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते तथा गगनबावड्याचे माजी सरपंच नंदकुमार पोवार यांनी केले. स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.
नंदकुमार पोवार यांनी आपल्या व्याख्यानात गगनगिरी महाराजांच्या तपश्चर्या, त्याग, योगसाधना आणि लोककल्याणकारी कार्याचा भावपूर्ण आढावा घेतला.
ते म्हणाले की, गगनगिरी महाराजांनी आयुष्यभर ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता, अन्न-पाण्याची तमा न बाळगता कठोर साधना केली. वन्य प्राण्यांवरही त्यांनी अपार माया केली. आजच्या काळात संधीसाधू बुवा-बाबांचे पेव फुटले असताना, गगनगिरी महाराजांसारखे खरे संत समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. त्यांनी लोकांमध्ये राहूनही एकांताचा मार्ग स्वीकारत आत्मसाधना केली आणि समाजासाठी एक आदर्श निर्माण केला.
हा सप्ताह सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजप्रबोधन आणि आध्यात्मिक उन्नतीचा ईश्वरी मेळावा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या व्याख्यानानंतर राधानगरीचे जयवंत महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. सप्ताहादरम्यान सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, तर सायंकाळी हरिपाठाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या संपूर्ण सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक वातावरणाचा लाभ घेतला.
