Fri. May 29th, 2026

संगमनेर:

रयत शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी विद्यालय गणोरे येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. यंदाही विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे संपूर्ण गणोरे परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या परीक्षेत कु. आर्यन विवेक आंबरे याने तब्बल ९५.८० टक्के गुण मिळवत गणोरे केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर आर्यनने हे यश संपादन करत विद्यालयाच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.

तसेच कु. समृद्धी बबन एखंडे हिने ९५.०० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तर कु. वैष्णवी भीमाशंकर गडाख हिने ९४.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. कु. समृद्धी संदीप एखंडे हिने ९०.२० टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक, तर कु. सार्थक नितीन खतोडे याने ८८.४० टक्के गुण मिळवत पंचम क्रमांक संपादन केला.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केवळ गुणवत्ता यादीतच नव्हे तर एकूण निकालातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे विद्यालयातील तब्बल ३० विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ३२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, १८ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर २ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश प्रेरणादायी मानले जात आहे.

विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी घेतलेले परिश्रम, नियमित मार्गदर्शन, अतिरिक्त तास, सराव परीक्षा आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हा उज्ज्वल निकाल शक्य झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दिलेला भरही या निकालातून अधोरेखित झाला आहे.

आर्यन विवेक आंबरे हा गणोरे ग्रामपंचायत सदस्य तथा वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मच्छिंद्र आंबरे यांचा सुपुत्र असून त्याच्या यशामुळे ग्रामस्थांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ. किरण लहामटे, अगस्तीचे ज्येष्ठ संचालक पर्बत अण्णा नाईकवाडी, माजी सरपंच के. बी. आंबरे, उपसरपंच राजेंद्र आंबरे, ज्येष्ठ नेते अशोक आहेर, भाऊपाटील आंबरे, शुभम आंबरे, संत नामदेव आंबरे, भाऊसाहेब दातीर, अंबादास दातीर, हरिदत्त कॉम्प्युटर सेंटरचे संचालक भाऊसाहेब आंबरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे, मुख्याध्यापक दिवे ए. वाय., सोमनाथ आंबरे, बाळासाहेब विष्णू आंबरे, गणेश आहेर, गणेश आंबरे, गणेश दातीर तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व ग्रामस्थ स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे गणोरे परिसरातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून भविष्यातही अशाच गुणवंत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यालयाची यशस्वी परंपरा अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!