संगमनेर:
अकोले तालुक्यातील गणोरे गावची कन्या आणि संगमनेर महाविद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री बाळासाहेब आहेर हिने आपल्या देदीप्यमान यशाने तालुक्याचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे.
सध्या एम.एस्सी. (बॉटनी) प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या भाग्यश्रीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ‘कमवा व शिका’ योजनेच्या माध्यमातून स्वतःचे शिक्षण पूर्ण करत आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला.
तिच्या या जिद्दीची दखल घेत संगमनेर महाविद्यालयाने तिला शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक कार्य, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मानाचा ‘सर्वोत्कृष्ट चतुरस्त्र विद्यार्थी पुरस्कार’ देऊन गौरविले. सुप्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन तिला सन्मानित करण्यात आले.
भाग्यश्रीच्या या यशाबद्दल ‘आपुलकी फाउंडेशन’च्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देतानाच तिचे वडील बाळासाहेब आहेर यांचाही सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याप्रसंगी आपुलकी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकशेठ वर्पे, गणोरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब घोसाळे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष आहेर, सोमनाथ आहेर, राजेंद्र आहेर, जालिंदरआप्पा आंबरे आणि ज्ञानेश्वर आहेर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कष्टकरी कुटुंबातील मुलीने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
