संगमनेर:
निरोगी आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळी’च्या वतीने अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये आयोजित पाच दिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराच्या माध्यमातून भविष्यातील विज्ञाननिष्ठ विचारांची सुदृढ पिढी घडवली जाईल, असा दृढ विश्वास संस्थेचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.
शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी तरुणांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर भर दिला. देशाच्या प्रगतीसाठी आर्थिक विषमता दूर होणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी मुलांमध्ये सामाजिक भान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यावर भर दिला. तसेच गावागावांत वाचन चळवळ सुरू करण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या वतीने पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या निवासी शिबिरात ११ ते १६ वयोगटातील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शिबिरादरम्यान सकाळच्या सत्रात योगासने, एरोबिक्स आणि व्यायामाचे प्रशिक्षण देण्यात आले, तर सायंकाळी मैदानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी पथनाट्य, अभिनय, नृत्य, गायन आणि झांज पथक यांतून कलागुणांचे सादरीकरण केले.
बौद्धिक सत्रात प्रा. बाबा खरात यांनी पर्यावरण, शिवाजी नाईकवाडी यांनी मानवी मूल्ये, हिरालाल पगडाल यांनी महात्मा गांधींचे विचार, स्वप्निल मानव यांनी आजचा युवक आणि प्राचार्य आशिष कुमार यांनी करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी मातीकाम, पेंटिंग, कागदकाम, ओरिगामी आणि हॉर्स रायडिंग यांसारखे उपक्रम राबवण्यात आले. तसेच साहसी खेळ, रायफल शूटिंग, स्काऊट गाईड, प्रथमोपचार, ट्रेकिंग आणि छायाचित्रणाचे प्रशिक्षण वैभवी आढाव, प्रा. कोमल मस्के, धनश्री टाकळकर, दिपाली गायके, समाधान जाधव आणि तेजस पवार या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी दिले.
या शिबिराचा अनुभव इतका सकारात्मक होता की विद्यार्थ्यांनी शिबिराचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली, ज्यावर डॉ. तांबे यांनी सुट्टीच्या काळात पुन्हा अशा उपक्रमाचे संकेत दिले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य आशिष कुमार, शोभा हजारे, अनंत शिंदे, बजरंग जेडगुले आणि हर्षल थेटे यांनी परिश्रम घेतले. यावेळी राजेंद्र जोरावर, विलास दिघे यांच्यासह पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


