Fri. May 29th, 2026

संगमनेर:

महाराष्ट्राची जिवंत लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे संगमनेरचे सुपुत्र रघुवीर खेडकर यांना नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि पंतप्रधान व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत खेडकर यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या ऐतिहासिक बहुमानामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आणि विशेषतः संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सुवर्ण क्षणाचा गौरव करताना राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा रघुभाऊंनी समर्थपणे पुढे चालवला आहे. आधुनिक काळात पारंपरिक लोककला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले असून, तमाशा मालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कलावंतांच्या हक्कासाठी यशस्वी पाठपुरावा केला आहे. हा तमाशा क्षेत्रातील खऱ्या कलावंताचा राष्ट्रीय गौरव आहे.

ज्येष्ठ नेते डॉ. सुधीर तांबे यांनी रघुभाऊंच्या कला व अध्यात्माच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करत हा क्षण तमाशा क्षेत्राला नवसंजीवनी देणारा असल्याचे म्हटले.

आमदार सत्यजित तांबे यांनी, रघुभाऊंनी हजारो कलाकारांची पालकासारखी जबाबदारी सांभाळल्याचे नमूद करत या पुरस्कारामुळे समाजात तमाशा कलावंतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असा विश्वास व्यक्त केला.

माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी खेडकर यांच्या लोकप्रिय ‘समई नृत्य’ आणि ‘थाळी नृत्य’ कलेला दिल्ली दरबारी मिळालेली ही मोठी दाद असल्याचे सांगितले,

तर युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनी हा क्षण संगमनेरच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आनंदाचा असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!